ताज्या घडामोडी

सफाई कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडविणे ही प्रशासनाची जबाबदारी – शेरसिंग डागोर


 

सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

पिंपरी, दि. ६ प्रतिनिधी
शहराची स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य टिकवून ठेवण्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मात्र, काम करताना त्यांना आरोग्यविषयक धोके, साधनांची कमतरता आणि प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे त्यांच्या समस्या केवळ नोंदवून न ठेवता त्या तातडीने आणि संवेदनशीलतेने सोडवणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात आयोजित सफाई कर्मचाऱ्यांच्या समस्या व प्रश्नांबाबत राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीच्या प्रारंभी महापौर रवि लांडगे यांनी राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर यांचे स्वागत केले.

या बैठकीस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम यांच्यासह महापालीकेच्या सर्वच विभागाचे विभाग प्रमुख हजर होते. या बरोबरच य सफाई कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी सागर चरण, संजय जगदाळे, गणेश भोसले, परशुराम कदम, अनिल लखन, योगेश रसाळआदी उपस्थित होते.
—————————-
सफाई कर्मचाऱ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ठोस पावले उचलावीत

शेरसिंग डागोर म्हणाले, सफाई कर्मचाऱ्यांना सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी शासनाने विविध धोरणे राबवली आहेत. मात्र, या योजनांचा लाभ प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी महापालिका प्रशासनाने अधिक सक्रिय भूमिका घ्यावी.सफाई कर्मचाऱ्यांच्या हक्क आणि अधिकारांची अंमलबजावणी ही केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात झाली पाहिजे. त्यांच्या वारसांना शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, तसेच विविध योजनांचा लाभ विनाअडथळा मिळवून देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांच्या तक्रारी आणि प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करणे आवश्यक आहे, जेणेकरून प्रश्नांची जलद आणि परिणामकारक हाताळणी होईल.
शेरसिंग डागोर,अध्यक्ष-सफाई कर्मचारी आयोग
——————————

आरोग्य, विमा आणि पदोन्नती प्रश्नांवर भर द्यावा:-

सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देताना डागोर यांनी कामाच्या स्वरूपामुळे त्यांना विविध आजारांचा धोका असतो. त्यामुळे त्यांना धन्वंतरीसारख्या वैद्यकीय विमा योजनांचा लाभ कोणत्याही आर्थिक ताणाशिवाय मिळणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले. तसेच, पदोन्नतीसंदर्भातील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या वेळेत पूर्ण कराव्यात, लाड-पागे समितीच्या शिफारशींची काटेकोर अंमलबजावणी करावी अशा स्पष्ट सूचना देखील त्यांनी प्रशासनाला दिल्या.
———————–

कर्मचारी वर्गाच्या समस्या सोडवण्यासाठी कटीबध्द:- आयुक्त सुर्यवंशी

आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी महापालिकेच्या वतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचे सांगितले. सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाने गतीने काम सुरू केले आहे. ज्या ठिकाणी तांत्रिक किंवा प्रक्रियात्मक अडचणी येत आहेत, त्या दूर करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. संबंधित सर्व शासन निर्णय आणि परिपत्रकांचा सखोल अभ्यास करून निर्णय प्रक्रिया अधिक गतिमान केली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
——————————–

कामगार प्रतिनिधींनी मांडलेल्या समस्या, तात्काळ कार्यवाही होणे गरजेचे:-

बैठकीदरम्यान आनेक सफाई कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी आणि कर्मचाऱ्यांनी विविध समस्या मांडल्या. या समस्या ऐकून घेत डागोर साहेब व मनपा आयुक्त सुर्यवंशी साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना त्या त्वरित सोडवण्याचे निर्देश दिले आहेत पन प्रशासन विभाग हे निर्देश कितपत गांभीर्याने घेते यावर देखील कर्मचारी वर्गाचे हित व भविष्य अवलंबून आहे. आयुक्त साहेब मात्र कर्मचारी वर्गाच्या समस्या बाबत सकारात्मक आहेत हे मात्र नक्की.

संजय जगदाळे, अध्यक्ष, शिव-फुले -शाहू-आंबेडकर कर्मचारी विचार मंच.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *