राजकीय

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: २०२६ प्रभाग ३० दापोडीतील समस्यांवर आधारित मयूर गायकवाड यांनी विकासाभिमुख जाहीरनामा केला जाहीर


पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक: २०२६

प्रभाग ३० दापोडीतील समस्यांवर आधारित मयूर गायकवाड यांनी विकासाभिमुख जाहीरनामा केला जाहीर

दापोडी (प्रतिनिधी):
आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 30 दापोडी परिसरातील नागरी समस्यांवर लक्ष केंद्रित करत पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडी चे अधिकृत उमेदवार मयुर गायकवाड यांनी विकासाभिमुख जाहीरनामा जाहीर करण्यात आला आहे.

या जाहीरनाम्यात दापोडी परिसरातील पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, स्वच्छता, वाहतूक, आरोग्य, शिक्षण आणि युवक रोजगार यासारख्या महत्त्वाच्या प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे.दापोडी परिसरात रस्त्यांची दुरवस्था, पावसाळ्यात पाणी साचणे, अनियमित पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनातील त्रुटी तसेच वाहतूक कोंडी या समस्या दीर्घकाळापासून नागरिकांना भेडसावत आहेत. याशिवाय महिलांची सुरक्षितता, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा आणि मुलांसाठी खेळाच्या मैदानांची कमतरता हेही गंभीर मुद्दे असल्याचे जाहीरनाम्यात नमूद करण्यात आले आहे.उमेदवाराने जाहीरनाम्यात सर्व अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण व सिमेंटीकरण, ड्रेनेज व्यवस्थेचे नूतनीकरण, 24 तास पाणीपुरवठ्यासाठी पाठपुरावा, नियमित कचरा उचल व वर्गीकरण, तसेच स्वच्छ सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्याचे आश्वासन दिले आहे. यासोबतच दापोडी चौकातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजन, सीसीटीव्ही कॅमेरे व एलईडी पथदिवे बसविण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
आरोग्य व शिक्षण क्षेत्रात महापालिकेच्या दवाखान्यांमध्ये सुविधा वाढविणे, मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, तसेच शाळा व अंगणवाड्यांच्या विकासावर भर देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण, उद्यानांची देखभाल आणि प्रदूषण नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला आहे.
“भ्रष्टाचारमुक्त, पारदर्शक आणि लोकाभिमुख कारभार हेच माझे ध्येय असून दापोडीचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे,” असे पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार मयुर गायकवाड यांनी सांगितले.
या जाहीरनाम्यामुळे प्रभाग 30 मधील मतदारांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून आगामी निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवरच लढत रंगणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *