पिंपरी-चिंचवडसाठी आता स्थानिक स्वराज्यच हवे! परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना संधी द्या – अँड. अतिश लांडगे यांचे जोरदार आवाहन
पिंपरी-चिंचवडसाठी आता स्थानिक स्वराज्यच हवे!
परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना संधी द्या – अँड. अतिश लांडगे यांचे जोरदार आवाहन
“आपले शहर – आपले सरकार ही भविष्याची नव्हे, तर वर्तमानाची गरज आहे”
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड हे शहर कोणाच्याही गुलामगिरीसाठी नाही, तर येथील नागरिकांच्या विकासासाठी आहे. या शहराचा विकास झाला पाहिजे, बकासपणा नव्हे. महापालिकेच्या सभागृहात जाणाऱ्या लोकप्रतिनिधींनी पक्षाचा नव्हे, तर जनतेचा अजेंडा राबवला पाहिजे, अशी ठाम भूमिका मांडत पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना बहुमतांनी निवडून द्या, असे जोरदार आवाहन आघाडीचे संयोजक व महाराष्ट्र-गोवा नोटराईज असोसिएशनचे अध्यक्ष अँड. अतिश लांडगे यांनी केले.

प्रभाग क्रमांक १९ मधील एका जाहीर बैठकीत बोलताना अँड. लांडगे यांनी सत्ताधारी व तथाकथित विरोधकांवर घणाघाती टीका केली.
ते म्हणाले, “देशात पिंपरी-चिंचवडची ओळख औद्योगिक नगरी म्हणून आहे. या शहरासाठी स्थानिक भूमिपुत्रांनी आपल्या जमिनी कवडीमोल दरात दिल्या. मराठवाडा, सोलापूरसह राज्याच्या विविध भागांतून आलेल्या कष्टकरी नागरिकांनी या शहराच्या वैभवात मोलाची भर घातली. मात्र आज काही समाजविघातक शक्तींमुळे या शहराला दृष्ट लागली आहे.”
डीपी-टीपीच्या नावाखाली भूमिपुत्रांच्या जमिनींची लूट, उद्योगधंद्यांचे पद्धतशीर खच्चीकरण, राज्यातून रोजगारासाठी आलेल्या नागरिकांना असुरक्षित बनवण्याचे कारस्थान, स्थानिक तरुणांचा रोजगार हिरावून घेण्याचे प्रयत्न आणि एसआरएच्या माध्यमातून झोपडपट्टीवासीयांची सर्रास फसवणूक सुरू असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
“या सगळ्याला आळा घालण्यासाठी बाहेरच्या नेत्यांच्या दावणीला बांधलेला पक्ष नव्हे, तर पूर्णपणे स्थानिक, स्वाभिमानी आणि निर्भीड राजकीय आघाडी हवी. ही गरज आम्ही पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून पूर्ण करत आहोत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
जर हे शहर आपले असेल, तर महापालिकेतील सरकारही आपलेच असले पाहिजे. शहराच्या हिताचे निर्णय पुणे, मुंबई किंवा दिल्लीकडे पाहून नव्हे, तर येथील मातीशी नाळ जोडलेल्या लोकांनीच घ्यावेत, असे सांगत अँड. लांडगे यांनी “गुलामी नको, राजकीय स्वराज्य हवे” असा स्पष्ट संदेश दिला.
यावेळी त्यांनी मतदारांना आवाहन केले की,
प्रभाग क्रमांक १९ मधील जितू पहलानी (कपबशी), गीतांजली वाघमारे (कपबशी), कविता मोरे (फलंदाज), अक्षय माछरे (बॅट)
तसेच प्रभाग क्रमांक १३, ९, ८ व ३० मधील परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. कपबशी हे परिवर्तनाचे चिन्ह असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.
शहर वाचवायचे असेल तर परिवर्तन विकास आघाडीला बळ द्याच लागेल!
पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडीला बळ देणे ही आज काळाची गरज आहे. अन्यथा सत्ताधारी व विरोधक यांची भ्रष्ट भागीदारी, तसेच बघ्याची किंवा सहभागी भूमिका घेणाऱ्या विरोधी पक्षांमुळे या शहराचे तीनतेरा व्हायला वेळ लागणार नाही.
शहरावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला तोंड देण्यासाठी स्थानिक शहर पातळीवरील सक्षम, निर्भीड आणि स्वाभिमानी राजकीय शक्ती हवी – आणि ती शक्ती म्हणजेच पिंपरी-चिंचवड परिवर्तन विकास आघाडी, असा ठाम विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला.

